Monday, March 9, 2009

मुस्लिमांचा मतदानाचा फतवा आणि ब्राह्मण

नुकतीच बातमी वाचली की, देशातल्या मुसलमानांपैकी बहुसंख्यांचे प्रतिनिधीत्व करणा-या काही शिखर संस्थांनी मुसलमानांनी मतदान करावे असा फतवा किंवा सूचना जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात, मुसलमानांनी इस्लामच्या दृष्टीने निवडणुकांकडे बघू नये, आणि म्हणूनच फक्त विशिष्ट पक्षाला किंवा धर्मिय उमेदवाराला मत देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केलीये. त्याही पलिकडे जाऊन, मुस्लिमांनी मुळात मतदान करावे याचा आग्रह धरण्यात आला आहे. आता असे फतवे बजावून विशिष्ट वर्गाला काही करण्यास सांगणे हेच मुळात खटकण्याजोगे आहे. त्यातही मतदान ही एकाचवेळी सार्वजनिक आणि वैयक्तिक बाब! यासाठी प्रबोधन जरूर व्हावे. पण, प्रबोधनात वैयक्तिकता, मतभेदांना जागा असते. ती अशा 'फतवा' सिस्टीममध्ये मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे जरी हे फतवे चांगल्या हेतूने आणि त्यातही मुसलमानांचा धार्मिक घट्टपणा पाहता, काहीशा उदारवादी भूमिकेतून जाहीर झाले असले, तरी त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही. पण, किमान पक्षी जर मुसलमानांच्या धार्मिक शिखर संस्था धर्मापार विचार करण्याची भाषा करत असतील, तर त्यांचं स्वागतच आहे.
इथे मला या घटनेची तुलना पुण्यातल्या 'बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशना'शी करावीशी वाटते. यातल्या अनेक (प्रतिगामी) ठरावांपैकी एक म्हणजे, ब्राह्मणांचे हित जपणा-या पक्षास, उमेदवारास मतदान करताना प्राधान्य द्यावे. (याच अधिवेशनात स्व-जातीय विवाह करण्याविषयीही एक ठराव झाला. मात्र, परशुरामाची आई रेणूका क्षत्रिय होती, हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. असो, तो वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे.) हे मान्य, की मेंदूंपेक्षा डोक्यांचे महत्व जास्त झालेल्या आजच्या लोकशाहीत, त्यातही महाराष्ट्रात पॉलिटिकली ब्राह्मणां स्थान आणि फायदे मिळत नाहीत. पण, म्हणून ब्राह्मणांचे हित पाहणा-यास मते द्यावीत. इतका प्रच्छन्न संकुचितपणा जाहीरपणे दाखवला जाणं खटकणारे ठरते. असाच ठराव जर मुसलमानांनी केला असता, तर टीकेचा आगडोंब उसळला असता. माझ्या या मतावरही जी रिझर्व्हेशन्स मांडली जाऊ शकतात, त्यांची मला कल्पना आहे. पण, ज्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची नवी पिढी पारंपरिक क्षेत्रांना त्यजून नवनव्या क्षेत्रात जातेय, त्यांना पुन्हा संकुचित राजकीय व्यवहारांत अडकवण्याचा प्रयत्न का व्हावा? हाच प्रश्न आहे. सध्या जातींच्या टोकदार गणितांची हवा गरम आहे. मान्य. पण, म्हणून जातीजातीचेच हितसंबंध पहायचे, मग पुरोगामी म्हणजे नक्की काय ते तरी या 'पुरोगामी' राज्याने ठरवायला हवे. मुस्लिम जसे धार्मिक अल्पसंख्य तसे ब्राह्मण जातीय अत्यल्पसंख्य. या नात्याने का होईना पण, ब्राह्मणांचे हित
पाहणा-यांना मतदान करा, असे म्हणणारे मुस्लिमांच्या या फतव्याचा विचार करतील का?

-प्रसन्न जोशी

No comments:

Post a Comment