Thursday, March 19, 2009

१, विजयपथ ते शिवसेना भवन, व्हाया मोतीबाग

“महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक जण शिवसैनिकच असतो. त्यामुळे हो, मी आजपासून शिवसैनिक झालो.”, अविनाश धर्माधिकारी यांनी ‘स्टार माझा’ला फोनो देताना असं म्हटलंय. मला एक वाक्य या निवडणुकीच्या काळात निलेश राणे, माणिकराव ठाकरे यांच्या तोंडून ऐकायला मिळालं, ते आठवलं. ‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो’ हे ते वाक्य. सध्या या वाक्याला ‘राजकारणात कधीही, कुणीही कुठल्याही विचारधारेचा, पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नसतो’, असंही घेता येईल असं वाटू लागलंय. धर्माधिकारींच्या शिवसेना प्रवेशानंतर तर नक्कीच. उद्या येनकेन प्रकारेण जर अविदा भाजपात किंवा संघात गेले, तर ते कदाचित असेही म्हणू शकतील की, हिंदुस्थानात
जन्मणारा प्रत्येकजण स्वयंसेवकच असतो. देशाची सेवा करणारा तो स्वयंसेवक. होय, मी स्वयंसेवक आहे. इथे मुळात एक प्रश्न मनात येतो, की ‘शिवसैनिक’ हे जे संबोधन शिवसेनेतच वापरले जाते, त्या शिवसेनेच्या पक्षीय, वैचारिक आणि कार्यपद्धतीच्या संदर्भांसकट सर्व महाराष्ट्रीय स्वत:ला ‘शिवसैनिक’ म्हणवतील का? फार दूरची बात सोडा पण, ‘चाणक्य मंडल’चे किती विद्यार्थी स्वत:ला ‘शिवसैनिक’ म्हणवून घेतील ? (यापुढे ‘चाणक्य मंडल’च्या विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा की नाही, हेही आत्ताच ‘शिवसैनिक’ धर्माधिकारी यांनी जाहीर करावेच!)
धर्माधिकारींबद्दल असं वाटायचं कारण म्हणजे, ज्या नैतिक पायाच्या राजकारणाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केलाय, त्याच्या विरूद्ध प्रवास करत त्यांनी आपल्याच प्रतिमेला छेद दिलाय. धर्माधिकारी यांनी जेव्हा प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला, तेव्हाच राजकारणात जायचे त्यांनी निश्चित केले होते. मुळातली संघ परिवाराची पार्श्वभूमी आणि त्यातच तत्कालीन लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे पुण्यात तिकिट मिळण्याचे त्यांना मिळालेले आश्वासन, जे पूर्ण झाले नाही म्हणून ते नंतर अपक्ष उभे राहिले. यामुळे धर्माधिकारी यांनी मुळात तेव्हाच आपल्याला आता ‘राजकारण’ करायचंय हे मनाशी पक्क केलं असतं, तर नंतर आपल्या राजकीयदृष्ट्या बदललेल्या प्रत्येक निर्णयाचं अपुरं समर्थन करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. कारण, एकदा ‘राजकारण’ करणार आहे असं स्पष्ट झालं की, लोकही आपल्या नेत्या, नायकाकडून जो त्याग ते करू शकत नाहीत त्यांची मागणी करीत नाहीत. संधीसाधू राजकारणाचे हे प्रच्छन्न समर्थन कुणास वाटेलही, ते तसंच आहेही. (याच राजकारणाचा तर धर्माधिका-यांनी वेळोवेळी धिक्कार केला!) कारण, मग धर्माधिकारींनी ज्यांना नेहमीच शिव्या घातल्या, ज्या तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंतांची ‘प्रकरणं’ माहित असल्याचा त्यांचा दावा होता, ज्या पक्षाच्या लोकांची अवैध, अनैतिक कामं करणार नाही म्हणून ते त्यांना थेट ‘मातोश्री’वर जायचेही आव्हान ते देत. (..आणि हे किस्से साप्ताहिक बौद्धिकात सांगायचे). त्याच एकाधिकारी शिवसेना पक्षात ‘शिवसैनिक’ म्हणून जायची वेळ त्यांच्यावर आली नसती.
धर्माधिकारी हे मूलत: स्वच्छ चारित्र्याचे बुद्धिमान व्यक्ती आहेत. आभाळाएवढं काम करण्याची हुशारी, क्षमता, दृष्टी त्यांच्याकडे आहे, पण अनेक वेळा अशा कामांसाठीचा धूर्त, कावेबाजपणा, क्रूरपणा (शक्य असूनही) त्यांच्याकडे नाही वा त्यांनी तो स्वत:त बाणू दिला नाही. म्हणून तर नेहरू युवा केंद्राचे संचालक असताना त्यांचं आणि तत्कालीन युवक कल्याण मंत्र्यांचं पटलं नाही, आणि त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. म्हणूनच, जिथं अशा प्रकारची वृत्ती हेच अस्तित्वाचं भांडवल आहे, त्या पक्षात धर्माधिकारीजी तुमचा निभाव लागेल का? प्रसंगी ज्या ‘मातोश्री’चा आदेशही धुडकावण्याचा नैतिक माज तुम्ही दाखवला असता, तो आता दाखवू शकाल का? जो पक्ष हिंदुत्वाचं निव्वळ भावनिक राजकारण करतो, तिथं थेट अजेंडा घेऊन काम करणारे तुम्ही रमाल का हो?

जाता जाता एक. आपल्या बोळक्याचं गूढ निष्पाप हसू चेह-यावर ठेवणा-या, विवादांच्या पुढे जाऊन ज्यांचं महात्म्य तुम्हीच सांगितलं त्या मोहन महात्म्याला आता विसरा. तुमच्या सध्याच्या पक्षाला आवडणारा नवा गांधी तुमची वाट पाहतोय.....

यतो यत समिहसेततो नौ अभयंकुरू
शन्न: कुरू प्रजाभ्यो, भयं न पशुभ्य:

सर्वकाळ सर्व शुभेच्छा...

प्रसन्न जोशी

No comments:

Post a Comment